राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिकेचा १४८व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा उत्साहात   

शिस्तबद्ध् संचलन, प्रशिक्षणपूर्तीचा उत्साह अन् ‘नारीशक्ती’चा सहभाग

पुणे : लष्करी बँडच्या तालावरील शिस्तबद्ध् कवायती, आसमंत दुमदुमणारा सावधान-विश्रामचा उद्धघोष एअरक्राप्ट विमानांनी दिलेली सलामी, मान्यवरांनी स्वीकारलेली मानवंदना अशा रोमहर्षक वातावरणात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिकेच्या (एनडीए) १४८व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा सकाळी एनडीएच्या अरुणकुमार क्षेत्रपाल मैदानावर पार पडला. प्रबोधिनीच्या इतिहासात प्रथमच लष्करी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या १७ मुलींच्या तुकडीने संचलनामध्ये भाग घेतला.
या संचलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मिझोरामचे राज्यपाल आणि माजी लष्करप्रमुख जनरल  व्ही. के. सिंग उपस्थित होते. एनडीएचे कमांडंट व्हाईस अ‍ॅडमिरल गुरचरणसिंग, उपकमांडंट एअर व्हाईस मार्शल सरताज बेदी, दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ आणि एअर मार्शल आशुतोष दीक्षित यावेळी उपस्थित होते.
 
सकाळी सव्वासहाच्या सुमारास अ‍ॅकॅडमीचे छात्र ‘कदम कदम बढाये जा’ या ड्रीलच्या तालावर मैदानावर आले. आपले तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून एनडीएतील करिअरच्या शेवटच्या संचलनात सहभागी होणार्‍या या छात्रांच्या चेहर्‍यावर शिस्त, धैर्य, त्याग, देशभक्ती दिसून येत होती. कॅडेमट कॅप्टन उदयवीर सिंग नेगी याने या संचलनाचे नेतृत्व केले. संचलनाची परंपरा असणारी प्रेसिडेंट्स कलर्स चॅम्पिअनशिप ट्रॉफी आणि चीफ ऑफ स्टाफ बॅनर हा निशाण आणि गोल्फ स्क्वॉड्रनने मिळविला. संचलनामध्ये १३४१ छात्रांनी सहभाग घेतला. त्यामध्ये प्रशिक्षण पूर्ण करणार्‍या ३३६ छात्रांचा समावेश होता. यामध्ये ११ मित्रदेशांमधील छात्र होते.
 
माजी लष्करप्रमुख, निवृत्त जनरल व्ही. के. सिंग यांनी संचलनाची पाहणी केली. त्यानंतर छात्रांनी शिस्तबद्ध कवायती, संचलन सादर केले. यावेळी उपस्थित असणार्‍या छात्रांच्या पालकांसह, मान्यवर लष्करी अधिकार्‍यांनी टाळ्यांच्या कडकडाटात छात्रांना प्रोत्साहन दिले. त्याचवेळी छात्रांचे कौतुक करण्यासाठी चेतन हेलिकॉप्टर, सुपर डिमोना आणि तीन सुखोई विमाने आकाशात झेपावली. त्यांनी आकाशामध्ये तिरंगा ध्वज उंचावत ‘त्रिशक्ती’ आकार (फॉरमेशन) साकारला. त्यानंतर सूर्यकिरण पथकातील कॅडेटनी मानवी मनोरा तयार करून संचलन पूर्ण करून बाहेर पडणार्‍या आणि ‘अंतिम पग’च्या दिशेने जाणार्‍या छात्रांना मानवंदना दिली.
 
सुखोई, चेतकची हवेतून सलामी
 
• समारंभात हवाई दलाच्या सुखोई-३० या लढाऊ विमानांनी सुदान ब्लॉकवरून उड्डाण करत विशेष सलामी दिली. याआधी चेतक हेलिकॉप्टर आणि सुपर डिमोना ग्लायडर्सनी आकाशात भरारी घेत उपस्थितांचे लक्ष वेधले.
 
पहिले तीन विजेते
 
•  या संचलनामध्ये चार्ली तुकडीच्या प्रिन्स राज, गोल्फ तुकडीच्या उदयवीर सिंग नेगी आणि नोव्हेंबर तुकडीच्या तेजस भट या छात्रांनी अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक मिळविला.
 
प्रशिक्षणाने उंचावला सन्मान : हरसिमरन कौर
 
‘सशस्त्र दलासाठी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील प्रशिक्षण पूर्ण करून आम्ही देशाच्या लष्करी सेवेसाठी सज्ज झालो आहोत. आईवडिल, शिक्षणाचे प्रोत्साहन त्यामागे आहेच, मात्र, या अकॅडमीने आम्हाला घडविले आहे, आमचा सन्मान उंचावला आहे, ’ अशी भावना कॅडेट हरसिमरन कौर हिने व्यक्त केली. तिने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील १४८व्या तुकडीमध्ये आपले लष्करी प्रशिक्षण पूर्ण केले आहे
 
एनडीएतील १४८व्या तुकडीमध्ये १७ महिला छात्रांचा समावेश होता. संचलनानंतर या मुलींनी आपल्या प्रशिक्षणाविषयी सांगितले. इशिता सांगवान म्हणाली, माझ्यासाठी आजचा क्षण अभिमानाचा आहे. या अ‍ॅकॅडमीमधील प्रशिक्षण खरोखर खडतर होते. पण, माझ्या मते यापुढे आमची जबाबदारी अधिक वाढली आहे. याठिकाणी दाखल झाल्यानंतर कधीही असा अभिमानाचा क्षण आमच्यासमोर येईल, असे वाटले नव्हते. पण, आज आईवडील, प्रशिक्षक यांच्याबरोबरीने प्रशिक्षण पूर्ण केल्याचा आनंद समाधान देणारा आहे. तिचे वडील एस. ए. सांगवान हे हरियाणातील शाळेमध्ये प्राचार्य आहेत. ते म्हणाले, ‘माझ्या मुलीची लष्करामध्ये दाखल होऊन देशसेवा करण्याची इच्छा होती. ती संधी केंद्र सरकारने २०२१ मध्ये घेतलेल्या निर्णयामुळे पूर्ण झाली. या निर्णयामुळे एनडीएमध्ये मुलींना प्रशिक्षणाची संधी मिळाली.

Related Articles